You are currently viewing कंधार, जिल्हा नांदेड येथील महामानवाच्या पुतळ्याची संघर्षगाथा

कंधार, जिल्हा नांदेड येथील महामानवाच्या पुतळ्याची संघर्षगाथा

गऊळ हे गाव नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्या पासून दहा किलोमीटर अंतरावर फुलवळ ते जाम या हायवे वर वसलेलं गाव आहे. साधारण साडेतीनशे कुटुंब असलेल्या या गावामध्ये मातंग, बौद्ध, भोई, वंजारी, परीट, कोळी, भंडारी, खिलाडी, कुंभार अशा विविध समाजाचे व जात समूहाचे लोक राहतात. बौद्ध व  मातंग समाजाची साधारण १३० घरे या गावात आहेत. 

 

गावाच्या मुख्य रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. शिवाय सरकारी गायरान जमिनीवर निवृत्ती महाराजाचा मठ विनापरवानगी बांधण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याप्रमाणेच  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचाही पुतळा उभा करण्यात यावा व त्यांच्या स्मारकासाठी राखीव जागा असावी असे गावातील मातंग व बौद्ध समाजाच्या मनात आले. महान साहित्यिक अण्णाभाऊ साठे हे देशाचे गौरवस्थान असल्यामुळे त्यांच्या पुतळ्यास कोणी विरोध करील असे दलित बांधवांना अपेक्षित नव्हते. 

 

म्हणून ग्रामपंचायतीकडे समाजातर्फे २०११ मध्ये  अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी जागा देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली. समाजाच्या या मागणीला प्रतिसाद देत ग्रामपंचायतीने ३७५० स्क्वेअर फूट एवढी जागा गट नंबर 8 याभागात रीतसर नोंद करून स्मारकासाठी राखीव केली. 

 

लगेचच निवृत्ती महाराजांच्या मठा लगत अनुसूचित जातीच्या लोकांना जागा का देण्यात आली यावरून गावांमधील सवर्ण जातिवादी लोकांच्या मनात धुसफूस सुरू झाली. काँग्रेसचे पुढारी बाबू गिरे यांनी काही जातीवादी गावकऱ्यांच्या या जातीय द्वेषाची पाठराखण करणारी भूमिका घेतली. त्यातून सवर्ण जातीतील तरुणांच्या मनात अधिकच जातीय विष पेरले गेले. अनधिकृत असलेला महाराजांचा मठ गावाला चालतो परंतु रीतसर परवानगी घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे स्मारक उभारण्यासाठीच राखीव करण्यात आलेली जागा तुमच्या डोळ्यात का खुपते? असा सवाल  दलित समाजाकडून विचारला जाऊ लागला. लोकशाहीर, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा स्मारकाच्या जागेत उभा करावा अशी इच्छा मातंग समाजातून व्यक्त होताच जातिवाद्यांची डोकी अधिकच फिरली. 

 

पुढे हे वाद टोकाला जाऊन गऊळ गावात अनुसूचित जात समूहावर सामूहिक बहिष्कार टाकण्यात आला. अनुसूचित जातीला गाव शिवारात बंदी लावण्यात आली गावातील इतर सर्व जात समूहांनी अनुसूचित जात समूहातील लोकांची कामे करण्यास नकार दिला त्यावेळी मातंग समाजाने मोडून न जाता आपला स्वाभिमान टिकवून ठेवला.  बहिष्कृत समाजातील या सर्व लोकांनी एकत्र येऊन स्वतःचे किराणा दुकान, हॉटेल इत्यादी गरजेचे उद्योग स्वतः सुरू केले. गावकऱ्यांनी विविध माध्यमातून दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला तरीही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा उभारण्याची मागणी कायम राहिली. 

 

पुढे २०२१ मध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी समारोप  वर्षाचे निमित्त  साधून दिनांक १ ऑगस्ट २०२१ रोजी अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी राखीव असलेल्या जागेत उभा करण्यात आला. पुन्हा एकदा या प्रकारामुळे तथाकथित उच्चवर्णीय लोकांच्या स्वाभिमानाला ठेच लागली. जातीय तणाव विकोपाला गेला. शेवटी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक अशा सर्व महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी जातीय तणाव कमी करण्यासाठी असा तणाव निर्माण करणाऱ्या जातिवाद्यांना समजवणे पेक्षा सदर चा पुतळा हटवण्याचा अजब निर्णय घेतला. अशा प्रसंगात प्रशासनाचा जातीवादी चेहरा उघडा पडला. 

 

ग्रामसेवकास बोलून त्याच्या कडून दबाव टाकून खोटी तक्रार नोंदवून घेऊन भारताची शान असणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला हटविण्यात आले. पुतळा हटवण्याच्या या जातीवादी प्रशासकीय कारवाईस समाजाकडून तेवढ्याच तीव्रतेने विरोध करण्यात आला. परंतु बळाचा वापर करून हा विरोध मोडून काढण्यात आला. पोलीस बळाचा अतिरिक्त वापर करत निशस्त्र जमावावरती अमानुष लाठी चार्ज करण्यात आला. शिवाय मातंग समाजाच्या तीस कार्यकर्त्यांवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत कारवाई करून गुन्हा नोंदविण्यात आला. इथेच न थांबता प्रशासनाने संजय देवकांबळे, संतोष देवकांबळे व अशा इतर पंधरा कार्यकर्त्यांवर कारवाई करून त्यांना सोळा दिवस तुरुंगात डांबून ठेवले. 

 

मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मिलिंद आव्हाड यांनी त्वरित गावातील समाजबांधवांची व कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. समाजावर जातीवादी भावनेतून झालेल्या या कारवाईची माहिती मिळताच महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांनी मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय विरोधात आवाज उठवला. बहुजन समाज पार्टीचे मनीष कवळे, मारुती वाडेकर इत्यादी अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे सतीश कावडे, विष्णू भाऊ कसबे इत्यादी, लहुजी क्रांती मोर्चा च्या नंदाताई लोखंडे या व अशा इतर संघटना व संघटना प्रमुखांनी समाजाला धीर देण्यासाठी भेटी दिल्या. मानवी हक्क अभियानाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष व कारवा अभियानाचे महाराष्ट्र राज्य संचालक मच्छिंद्र गवाले यांनी शासनाकडे पोलिसांच्या लाठी हल्ल्यामध्ये जखमी झालेल्याना योग्य ती वैद्यकीय मदत मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. 

 

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात यावी यासाठी विविध संस्था व संघटनांनी पाठिंबा जाहीर केला. 

 

गावांमध्ये शांतता असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी पोलीस अधीक्षकांना सोबत घेऊन गावामध्ये ५ सप्टेंबर २०२१ रोजी सलोखा बैठक घेतली. राज्यभरातून सामाजिक चळवळींचा वाढता दबाव पाहता शासनाने वाचनालय उभे करण्याच्या नावाखाली समाजाला सहा लाख 30 हजार रुपये मंजूर केले व पूर्वीच नियोजित केलेली २७५० स्क्वेअर फुटाची जागा मोजून निशाणी बद्ध करून ताब्यात दिली. 

 

परंतु नियोजित जागी महामानवाचा पुतळा उभारला गेला पाहिजे, कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घेऊन लाठीहल्ल्यात जखमी झालेल्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे या व अशा मागण्यांसाठी एक दिवशीय धरणे आंदोलन 21 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात आले. 

 

गऊळ गावातील मातंग व बौद्ध समाज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नियोजित जागी उभारण्यात यावा या मागणीवर आजही ठाम आहे. पुतळा ऐवजी वाचनालय उभारा अशी वेगळीच कलाटणी देऊन जातीवादावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होतो आहे. याउलट आमच्या लेकरा बाळांना साठी आम्ही वाचनालय, दवाखाने, शाळा इत्यादी सुरु करूच परंतु आमच्या महामानवाचा पुतळा आम्ही उभारणारच असा निर्धारही दलित समाजाकडून व्यक्त होत आहे. नर्मदाबाई देव कांबळे, शकुंतलाबाई देव कांबळे आशा गावातील लढवय्या दलित महिलांनी आम्ही ही लढाई यशस्वी करून आमची अस्मिता अबाधित ठेऊ असा विश्वास व्यक्त केला. जय भीम. 

 

–   माधव देवकाबळे, नांदेड; अमित तिखाडे, वर्धा 

Leave a Reply